GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Nagpur University Recruitment 2016

Nagpur University Recruitment 2016

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदभरती अद्यापही रखडलेली आहे. २0१३ साली देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार अद्यापही पावले उचलण्यात आलेली नाही. याचा फटका कर्मचारी व अधिकार्‍यांना सहन करावा लागत असून, त्यांच्यावरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतोच आहे. नागपूर विद्यापीठाकडून अशास्थितीत लवकरात लवकर पदभरती करण्यात यावी, अशी मागणी नागपूर विद्यापीठ बहुजन कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
नागपूर विद्यापीठात आजघडीला कर्मचार्‍यांच्या असंख्य समस्या आहेत. संघटनेतर्फे प्रशासनाला अनेकदा याबाबत लेखी निवेदने देण्यात आली. परंतु या निवेदनांवर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. पदभरतीसंदर्भात जुने दिशानिर्देश असताना नवीन दिशानिर्देश तयार करण्याची आवश्यकताच काय होती, असा प्रश्न नागपूर विद्यापीठ बहुजन कर्मचारी संघटनेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.
अनेक प्रस्तावांवा विधिसभा व व्यवस्थापन परिषदेने हिरवी झेंडी दाखविल्यानंतरदेखील त्याची अंमलबजावणी झालेली नाही. विद्यापीठातील अंतर्गत राजकारणामुळे हे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे. याशिवाय विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्याची संघटनेची जुनी मागणी आहे. कर्मचार्‍यांच्या ‘ग्रेड-पे’ तसेच पदनामातील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. महिलांसाठी अद्यापही विद्यापीठात ‘कॉमन रूम’ तयार झालेली नाही, याकडेदेखील संघटनेने लक्ष वेधले आहे. कर्मचार्‍यांच्या विविध मुद्यांवर आम्ही सातत्याने प्रशासनाला पत्र लिहितो आहे. परंतु यावर कार्यवाही झालेली नाही. ६ एप्रिल रोजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्यासोबत बैठक होणार असून यात कर्मचार्‍यांच्या हिताकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, असे मत संघटनेचे अध्यक्ष सी.डी. शेळके यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.