मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ
Pre-Matric Minority Scholarship
Students will now be able to apply online till December 15 to participate in the pre-matric scholarship scheme for meritorious students of classes I to X from economically weaker sections of the minority community in the state. Pre-Matric Scholarship Scheme has been started in the state from 2008-09. Under this scheme, students have started filling up applications on the ‘NSP 2.0’ portal this year
राज्यातील अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आता १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असलेल्या पंधरा कलमी कार्यक्रमानुसार मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी २३ जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार राज्यात मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना २००८-०९ पासून सुरू झाली आहे. या योजनेतंर्गत यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांचे अर्ज ‘एनएसपी २.०’ पोर्टलवर भरण्यास सुरवात झाली आहे.
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती, ती ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली होती. आता या मुदतीला आणखी वाढ दिली असून विद्यार्थ्यांना १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर या शिष्यवृत्तीच्या अर्ज पडताळणीसाठी देखील मुदतवाढ दिली असून शाळा स्तरावर ३१ डिसेंबरपर्यंत आणि जिल्हा स्तरावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत अर्जांची पडताळणी करता येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने दिली आहे.
‘मॅट्रिकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेतंर्गत प्रलंबित अर्जांची दिलेल्या मुदतीत पडताळणी पूर्ण न झाल्यास संबंधित विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शाळांनी दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून सर्व नवीन आणि नूतनीकरण अर्जांची पडताळणी पूर्ण करावी,’’ अशी सूचना अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.