अंतिम’ परीक्षेसाठी राज्यभर एकच पॅटर्न; ‘अशी’ असणार प्रश्नपत्रिका
A single statewide pattern for the ‘final’ exam
अंतिम’ परीक्षेसाठी राज्यभर एकच पॅटर्न; ‘अशी’ असणार प्रश्नपत्रिका
सोलापूर: राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांशी संलग्नित साडेपाच हजार महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षासाठी सुमारे साडेसात लाख विद्यार्थी आहेत. कोरोना संसर्गाची स्थिती पहाता, या सर्वांची ऑफलाइन परीक्षा घेणे अशक्य असून दिर्घ प्रश्नांची उत्तरे सोडवून घेणे ऑनलाईनच्या दृष्टीने सोयीचे नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे ऑनलाईनची साधने आहेत, त्यांची ऑनलाइन तर ज्यांच्याकडे तशी साधने नाहीत, त्यांची ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय सद्यस्थितीत रास्त वाटत आहे. दुसरीकडे चार सत्रात परीक्षा घेतल्या जाणार असल्याने प्रश्नत्रिकेचा राज्यभर एकच पॅटर्न राज्यभर राबविला जाणार असून बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देण्याचे नियोजन असल्याचेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. ऑफलाइन परीक्षेच्या दृष्टीने विद्यापीठांनी आता संलग्नित महाविद्यालयांकडील उपलब्ध संगणक, वर्गखोल्या, बेंच याची माहिती मागविली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळा असून प्रत्येक विद्यापीठांची भौगोलिक परिस्थितीही वेगळी आहे. त्यामुळे एकाचवेळी परीक्षा घेणे अशक्य असून संबंधित विद्यापीठांनी त्यांच्या क्षेत्रातील संसर्गाची स्थिती विचारात घेऊन परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्वांना दिल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने असायमेंट घेऊन तथा ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेचे पर्याय यापूर्वीच दिले आहेत. मात्र, असायमेंट पध्दतीने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व्यवस्थीत होणार नसल्याने ऑनलाइन व ऑफलाइन या पर्यायातून परीक्षा घेण्याचा निर्णय विचाराधिन असल्याचे समितीतील सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. विद्यार्थ्यांना बहूपर्यायी प्रश्नपत्रिका देऊन त्यांच्याकडून उत्तरपत्रिका सोडवून घेतल्या जाणार आहेत.
डेमोद्वारे विद्यार्थ्यांची घेतली जाईल मौखीक चाचणी
नवी परीक्षा पध्दत अवंलबण्याच्या 10 ते 15 दिवस अगोदर विद्यार्थ्यांची मौखिक चाचणी घेण्यात येणार आहे. त्यावेळी त्यांना परीक्षा देताना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याची नेट कनेक्टिव्हिटी मधूनच गेल्यास, त्याला पुढील आठ तासात कधीही उत्तरपत्रिका सोडविता येईल, असाही पर्याय देण्याचा निर्णय काही विद्यापीठांनी घेतला आहे. दरम्यान, ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करुन त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्याकडे मास्क, सॅनिटायझर असावे, वर्गात परीक्षा देताना सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. तापसदृश्य तथा कोविड पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिली जाईल, असेही नियोजन आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उद्या सोमवारी (ता. 30) शिक्कामोर्तब करुन नियोजनाची अधिकृत घोषणा करतील, असेही सांगण्यात आले.
अभ्यास समितीच्या सदस्यांना गोपनियतेच्या सूचना
राज्यातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी दहा सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर हे अध्यक्ष आहेत. तर सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, एसनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईच्या कुलगुरु डॉ. शशिकला वंजारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ हे सदस्य आहेत. तर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वळूकर, डॉ. विजय खोले हे निमंत्रित सदस्य आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने हे समन्वयक आहेत. या सर्व सदस्यांना झालेली चर्चा गोपनिय ठेवण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्याचे समितीतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
महाविद्यालयांकडील उपलब्ध साधनांची माहिती मागविली
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षासाठी सुमारे 22 हजार विद्यार्थी आहेत. त्या सर्वांची ऑफलाइन परीक्षा घेणे सद्यस्थितीत अशक्य आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांमधील बेंच, वर्गखोल्या, संगणकाची माहिती मागविली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा घेण्याच्यादृष्टीने नियोजन सुरु झाले आहे.
सोर्स: सकाळ