विद्यार्थ्यांना मिळणार मायक्रासॉफ्टचे प्रशिक्षण!!

विद्यार्थ्यांना मिळणार मायक्रासॉफ्टचे प्रशिक्षण!!

Microsoft, Aicte Collaborate to Skill Students : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ‘मायक्रोसॉफ्ट’सोबत करार केला आहे.

Microsoft, Aicte Collaborate to Skill Students : देशातील विद्यार्थ्यांना दर्जेदार ऑनलाइन शिक्षण मिळावे, या उद्देशाने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ‘मायक्रोसॉफ्ट’सोबत करार केला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुमारे दीड हजारांहून अधिक कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. यासाठी https://free.aicte-india.org/ हे विशेष वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.

या पोर्टलवर मायक्रोसॉफ्टचे प्रशिक्षण कक्ष ‘मायक्रोसॉफ्ट लर्न’सोबत जोडले गेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी, डेटा सायन्स आणि क्लाऊड क्म्प्युटिंगसारखे विषय शिकता येणार आहेत. विद्यार्थ्यांना अधिक चांगले प्रशिक्षण देण्यासाठी विविध वेबिनारचे आयोजनही करण्यात येणार असून, मायक्रोसॉफ्टच्या विविध परीक्षांसाठी आर्थिकदृष्ट्या असक्षम एक हजार विद्यार्थ्यांना मोफत संधी दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या नोकरी मिळण्याच्या संधीही यामुळे वृद्धिंगत होतील, असे मत एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत शिक्षण देण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण असेल, असेही ते म्हणाले. करोनाकाळात विद्यार्थ्यांना मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग व्हावा व त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने हा करार करण्यात आल्याचे ‘मायक्रोसॉफ्ट इंडिया’चे अध्यक्ष अनंत महेश्वरी यांनी सांगितले.

तंत्रज्ञान शिक्षणाची संधी

या करारामुळे विद्यार्थ्यांना वर्तमानातील तसेच भविष्यातील तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. याचबरोबर १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना त्यांचे स्वत:चे अॅप विकसित करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग करणे यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्टने ‘अझूर फॉर स्टुडंट’ हे व्यासपीठही खुले करून दिले आहे. यात विद्यार्थ्यांना माहितीचा मोठ्या प्रमाणावर खजिना उपलब्ध होणार आहे. तसेच अझूरच्या वार्षिक १०० अमेरिकन डॉलर्स शुल्क असलेल्या २५ मोफत सेवाही त्यांना वापरता येणार आहे.

शिक्षकांना प्रशिक्षण

या कराराद्वारे शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट लर्न फॉर एज्युकेटर्स’ हे व्यासपीठही उपलब्ध करून दिले आहे. मायक्रोसॉफ्टने तयार केलेला शिक्षकांसाठीचा विशेष अभ्यासक्रम देण्यात आला आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मायक्रोसॉफ्टचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

सोर्स : म. टा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!