Nashik Mahanagarpalika Hospital work outsource
Nashik Mahanagarpalika Hospital work outsource
नाशिक महापालिका रुग्णालयांची स्वच्छता आउटसोर्सिंगने
Nashik Municipal Corporation Recruitment 2019
महापालिका प्रशासनाने पालिकेच्या सेवांचे खासगीकरण करण्याचा सपाटाच लावला आहे. शहरातील रस्ते स्वच्छतेसाठी ७०० सफाई कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंगच्या ठेक्याचा वाद सुरू असतानाच, आता पालिकेची रुग्णालये, दवाखान्यांमधील साफसफाई आणि स्वच्छतेचे आउटसोर्सिंग केले जाणार आहे. पालिकेच्या रुग्णालये, दवाखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना मूळ विभागात पाठवून या रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी आउटसोर्सिंगचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रशासन, वैद्यकीय अधीक्षक आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत.
पालिकेत सध्या आउटसोर्सिंगचे वारे वाहत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंगच्या ठेक्यावरून सध्या वाद सुरू असून थेट शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या ठेक्याच्या निविदा प्रक्रियेतील अनागोंदीकडे लक्ष वेधत ठेका रद्द करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी या निविदा प्रक्रियेतील गोंधळ उघड करत याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. तर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी हा ठेका रद्द न झाल्यास शासनाकडे दाद मागण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील निविदा समितीमार्फत या निविदा प्रक्रियेची फेरतपासणी करण्याचा निर्णय आयुक्त गमे यांना घ्यावा लागला आहे. हा वाद शांत होत नाही तोच आता नवा वाद ओढावण्याची शक्यता आहे. रुग्णालये आणि दवाखान्यांमधील सफाई कर्मचाऱ्यांना मूळ विभागात पाठवून रुग्णालयांसाठी आउटसोर्सिंगद्वारे सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार आहे. या ठिकाणी कार्यरत असलेले ६० सफाई कर्मचारी हे मूळ सेवेत वर्ग केले जाणार आहेत.