अग्निशमन विभागात ५१३ कर्मचारी पदे रिक्त
Pune Municipal Corporation Fire Department Recruitment
Fire Department 910 Posts are sanctioned out of which 500+ posts are still vacant. Due to retirement and departmental transfers, various posts in the fire department are vacant. The post was not filled as the Adarsh Common Service Admission Regulations were not approved.
पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागात मंजूर ९१० कर्मचारी पदांपैकी तब्बल ५१३ कर्मचारी पदे रिक्त असल्याने, शहराची अग्निसुरक्षा ‘गॅस’वर आहे. या जागा भरण्यासाठीची नियमावली गेल्या तीन वर्षांपासून राज्याच्या नगरविकास विभागाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे. त्याचे चटके शहराच्या अग्निशमन सेवेला बसत असून, आगीची मोठी दुर्घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत तातडीने धावून जाण्यासाठी पुरेसे अग्निशमन कर्मचारी उपलब्ध नसल्याचे दुर्दैवी वास्तव लालफितशाहीच्या कारभारामुळे पुणेकरांना भोगावे लागण्याची भीती आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला (एनआयसीयू) लागलेल्या आगीच्या घटनेनंतर राज्यातील अग्निसुरक्षेचा विषय ऐरणीवर आला. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत किंवा घटनेनंतर कमीत कमी हानी व्हावी, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अग्निशमन दलात पुरेसे कुशल कर्मचारी असणे अपेक्षित आहे. मात्र, पुणे महापालिकेसह अनेक महापालिका, नगरप%B लिका, नगर पंचायतींच्या अग्निशमन दलात मनुष्यबळाचा अभाव आहे. त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी अग्निशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८मध्ये आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली तयार केली. ही नियमावली नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केली. मात्र, तीन वर्षे उलटूनही या नियमावलीला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे अग्निशमन विभागातील भरती रखडली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागातील ५५ टक्के रिक्त पदे भरण्यात अडचणी येत असून, अवघ्या ४५ टक्के कर्मचाऱ्यांच्या जोरावर हा विभाग अग्निशमन सेवेची धुरा पेलत आहे.
‘पुरेसे मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. एका केंद्रावर किमान नऊ ते दहा कर्मचारी असणे अपेक्षित आहे. उंच इमारतीतील आग शमविण्यासाठी लागणारी शिडी उचलण्यासाठीच चार कर्मचारी लागतात. मात्र, काही केंद्रांवर केवळ तीन ते चार कर्मचारी उपलब्ध आहेत,’ असे अग्निशमन विभागातील एका कर्मचाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. ‘दुर्दैवाने एकाच वेळी तीन ते चार ठिकाणी आग लागल्यास पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावी मदत व बचावकार्याला फटका बसेल, अशी भीतीही त्याने व्यक्त केली
मुख्यमंत्र्यांना पत्र
अग्निशमन विभागातील रिक्त पदांसंदर्भात सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. पुणे महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठीची नियमावली तातडीने मंजूर करण्याचे आदेश नगरविकास विभागाला देण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे. ‘अग्निशमन विभागातील पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे अडचणीचे आहे. ही बाब पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी सातत्याने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना वारंवार कळवूनही विभागाकडून निर्णय घेतला जात नाही, हे दुर्दैवी आहे,’ असेही वेलणकर म्हणाले.
पुणे महापालिकेचा अग्निशमन विभाग
- ९१० – मंजूर कर्मचारी पदे
- ३९७ – भरलेली पदे
- ५१३ – रिक्त पदे
निवृत्ती, खात्यांतर्गत बदल्यांमुळे अग्निशमन विभागातील विविध कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाली नसल्याने त्या जागी भरती झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी ११ गावे पालिका हद्दीत समाविष्ट झाली आहेत. आता २३ गावे पालिकेत येणार आहेत. त्यामुळे अग्निशमन केंद्रांचा विस्तार केला जात आहे. सध्याच्या १४ अग्निशमन केंद्रांसाठीच पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांना सुट्या देता येत नाहीत, मोठी घटना घडल्यास अन्य केंद्रांवरूनही अग्निशमन गाड्या पाठवाव्या लागतात.
– प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महापालिका
सोर्स : म. टा.