बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष परीक्षेचा पर्याय

Special Exam Option For B Ed Cet Candidates

बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष परीक्षेचा पर्याय

विद्यापीठाच्या परीक्षा आणि सीईटी एकाच दिवशी

नागपूर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाअंतर्गत २१ ते २३ ऑक्टोबरला बी.एड. सीईटीची परीक्षा होणार आहे. याच दरम्यान राज्यातील अकृषक विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या ऑनलाइन परीक्षाही सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठांद्वारे विशेष परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नसून त्यांना विशेष परीक्षेमध्ये त्या दिवसाचा पेपर देता येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सर्व विद्यापीठांनी अंतिम वर्षांच्या परीक्षांचे आयोजन केले आहे. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा या ८ ते ३०, तर पुणे विद्यापीठाच्या १२ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान आहेत. इतर विद्यापीठांनीही याच दरम्यान परीक्षांचे आयोजन केले आहे. २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान बी.एड. सीईटी परीक्षा होणार आहे. या ऑनलाइन परीक्षेसाठी सकाळी १० व दुपारी २ वाजता अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. याच दरम्यान पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या परीक्षा आहेत.

विशेष म्हणजे, बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे पदवी अंतिम वर्षांचे असतात, तर काही विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असतानाही बी.एड. सीईटी देत असतात. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षांमध्येच बी.एड. सीईटी परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षेचे ओळखपत्र दाखवून विशेष परीक्षेसाठी आपल्या महाविद्यालयांकडे अर्ज करता येईल. काही विद्यापीठांमध्ये या विद्यार्थ्यांची ऑनलाइन तर काही विद्यापीठांमध्ये ऑफलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षार्थीचे कुठलेही नुकसान होणार नसून त्यांनी गोंधळून जाऊ नये, असे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

पर्याय काय?: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे बी.एड. सीईटी परीक्षेच्या एका तासाआधी विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी बी.एड. सीईटीच्या एका तासाआधी विद्यापीठाची परीक्षा देण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. याशिवाय हे शक्य न झाल्यास त्यांच्यासमोर विशेष परीक्षेचा पर्याय राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!