सुधागड तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
Sudhagad Taluka Bharti 2021
Sudhagad Taluka Bharti 2021: There are more than 50,000 livestock in Sudhagad taluka. There are six veterinary dispensaries here for them. However, as most of the posts of veterinary officers and staff are vacant in these hospitals, the animals and birds are not treated in time.
सुधागड तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
सुधागड तालुक्यात ५० हजारांहून अधिक पशुधन आहे. त्यांच्यासाठी येथे सहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र, या दवाखान्यांत पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बहुतांश पदे रिक्त असल्याने येथील जनावरांना व पशु-पक्ष्यांना वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
सुधागड तालुक्यात पाली, जांभूळपाडा व चव्हाणवाडी येथे श्रेणी एक चे ३, तर वाघोशी, खवली व नांदगाव येथे श्रेणी दोनचे ३ असे सहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये १०० गावांसह वाड्या-वस्त्यांचा समावेश होतो.पालीमध्ये पंचायत समितीचे पशुसंवर्धन विभागाचे कार्यालय आहे. येथील आणि पाली पशुवैद्यकीय दवाखाना व चव्हाणवाडी येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. पाली पंचायत समिती व नांदगाव पशुवैद्यकीय दवाखाना येथे प्रत्येकी एक पशुधन पर्यवेक्षकपद रिक्त आहे. पाली व खवली पशुवैद्यकीय दवाखाना आणि पाली पंचायत समिती येथे प्रत्येकी एक शिपाई पद रिक्त आहे. याबरोबरच चव्हाणवाडी आणि पाली येथे ड्रेसरचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. अशी रिक्तपदे असल्याने खेड्यापाड्यातील आजारी पशु-पक्ष्यांना वेळेत उपचार मिळत नाहीत. तसेच लसीकरण व विविध योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. अनेक वेळा उपचार न मिळाल्याने पशूंना आपले प्राण गमवावे लागत आहेत. उपलब्ध कर्मचारी कामानिमित्त फिरतीवर असतात. त्यामुळे उपचारासाठी दवाखान्यात पशू व जनावर घेऊन येणाऱ्या लोकांना उपचाराविना मागे फिरावे लागत आहे.
उपलब्ध डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी चांगली सेवा देत आहेत. मात्र, तरीही अतिरिक्त भार असल्याने त्यांच्या कामांना मर्यादा येते. परिणामी शेतकरी, पोल्ट्री व दुग्ध व्यावसाईक, पशुपालक यांची गैरसोय होते. त्यामुळे ही रिक्त पदे शासनाने ताबडतोब भरावीत.
एका अधिकाऱ्याकडे तीन ठिकाणचा अतिरिक्त भार
तालुक्याला चार पशुधन विकास अधिकाऱ्यांची तरतूद आहे आणि सध्या फक्त पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ जांभूळपाडा येथील एकच पशुधन विकास अधिकारी जागा भरलेली आहे. या अधिकाऱ्याकडे पशुवैद्यकीय दवाखाना पाली, पशुवैद्यकीय दवाखाना चव्हाणवाडी आणि तालुक्याचा पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पाली असे तीन अतिरिक्त कार्यभार दिले आहेत. तालुक्यात फक्त दोन पशुधन पर्यवेक्षक असून, त्यांच्याकडे एक-एक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. शिपाई व व्रनोपचारक यांची पदे ९ असून, ५ रिक्त आहेत.